Sunday, July 3, 2011

लहान-मोठं

वयानुसार माणसाचे विचार बदलतात हे जरी खरं असलं, तरी बरेचदा, वय वाढलं म्हणजे आचार-विचारांत एक ठराविक बदल व्हायलाच पाहिजे, असा काहीसा प्रकार बघायला मिळतो. कॉलेजमधे गेल्यावर मुलांना शाळेत केलेल्या गोष्टी करणं ’काहीतरी’ वाटायला लागतं. पुढे नोकरी लागल्यावर मग कधी खाली उतरून एखादा खेळ खेळणं म्हणजे अगदीच लहान मुलासारखं वाटायला लागतं. मोठं झालं की साध्या साध्या गोष्टींवरच्या प्रतिक्रीया ’मोजून मापून’, ’कॅल्क्युलेटेड’ यायला लागतात. केवळ ’आता मी काय लहान आहे का असं खोखो हसायला?’ असं म्हणून पोट धरून हसण्यासारख्या विनोदावरही रुमालाआडून हळूच्च हसणारी लोकं असतात.

उलटही प्रकार असतात, नाही असं नाही. म्हणजे पत्त्यात भिकार सावकार चा डाव लहान मुलाइतकंच लहान होऊन रमून खेळणारी मंडळी असतात. टॉम अ‍ॅण्ड जेरी चा एखादा ५० वेळा बघितलेला भाग पुन्हा तितकाच आनंद घेऊन बघणारे आजी आजोबाही (वयाने) असतात. 

 
"मोठं होणं आपल्या हातात नसतं; पण लहान रहाणं नक्कीच आपल्या हातात असतं."
-अ. ज. ओक.

2 comments: