Friday, July 15, 2011

वेळ एक; राग अनेक

मुंबईत फ़ार दुर्दैवी घटना होतात हो. हल्ले काय, स्फ़ोट काय, छोट्या छोट्या (तुलनेने) गुन्ह्यांची तर गणतीच नाही. पण राजकारणी पक्षांचा या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बघून हसू येतं. घटना एक, पण प्रत्येक पक्ष त्याकडे आपापल्या चश्म्यातून बघतो. आता हल्ले, स्फ़ोटांचं बघता, सत्ताधारी, ती घटना ही कशी ’अपघात” होती आणि ती थांबवता आली नाही म्हणजे आम्ही बेजबाबदार कसे ’नाही’ अशा आशयाचं काहीसं बोलतात. सत्तेबाहेरच्यांना हीच घटना”संधी’ म्हणून दिसते. आम्ही असतो तर हे कसं थांबवलं किंवा परतवलं असतं हे पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही तर फ़ार चमत्कारिक असतात. म्हणजे, कापुसकोंड्याच्या गोष्टीत जसं काहीही उत्तर दिलं तरी सांगणारा पुन्हा ’कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?’ या पालुपतावर येतो तसं यांचं आपलं एकच काहीतरी असतं जे ते धरून बसतात, मग घटना कुठलीही असो. थोडक्यात हे कसं आहे माहित्ये, की



’संगीतात वेगवेगळ्या वेळी आळवायचे वेगवेगळे राग असतात, पण राजकारणात मात्र वेळ एकच असली तरी वेगवेगळी मंडळी वेगवेगळे राग आळवतात.’ 


- अ. ज. ओक

1 comment:

  1. Aadhichya paricchedacha masta jamlay! Mala aawadla :)

    ReplyDelete