एकदा एक मुलगा रस्ता ओलांडत होता. त्याच्यासोबत त्याचे काही मित्र होते. तसा तो मुलगा अगदी शांत आणि गोष्टी सांभाळून करणारा होता. पण त्या दिवशी रस्ता ओलांडण्यासाठी पाऊल पुढे टाकणार इतक्यात त्याच्या मित्राने मागून त्याला सांगितलं "थांब थांब ती गाडी जोरात येतेय"... लगेच दुसरा मित्र म्हणाला, "अरे नाही रे ती लांब आहे, चल." टाकलेलं आणि पुन्हा मागे घेतलेलं पाऊल त्याने पुन्हा पुढे टाकलं; ते त्या गाडीला धडकून पडण्यासाठी.
हे एक छोटं उदाहरण झालं. पण दररोज माणूस शेकडो गोष्टी करतो. अनेक निर्णय घेतो. त्यासाठी माहिती असलेल्या आणि नव्याने माहिती झालेल्या कित्येक गोष्टींचा तो विचार करतो. आपापल्या विचारांनुसार अंदाज बांधतो, गणितं मांडतो. हे सगळं करताना त्याचा मेंदू आणि त्याचं मन, दोघे एकमेकांशी ताळमेळ साधत काम करत असतात.
आणि मग अशा प्रक्रियेत त्याला मिळतात, अनेक सल्ले, अनेक उपदेश, बहुतेक वेळा त्याच्या कल्पनेला बगल देणा-या अशा अनेक कल्पना, आदेश, आणि बरंच काही. इथे त्याचा मेंदू संभ्रमित व्हायचा सर्वाधिक संभव असतो; आणि बहुतेक वेळा तो होतोच. मग घडतात चुका, घोळ, आणि गडबडी.
हे सल्ले प्रत्येक वेळी चुकीचे असतात असं मला म्हणायचं नाही. परंतु प्रत्येक जण एखाद्या कामात त्याची स्वत:ची अशी काही गणितं मांडत असतो, त्यानुसार निर्णय घेत असतो... या प्रक्रियेला ते नक्कीच ’डिस्टर्ब’ करतात. आत्तापर्यंतच्या माझ्यासकट जगातील अनेक माणसांच्या झालेल्या चुका, आणि गल्लती बघून मला एवढंच म्हणावंसं वाटतं, की
"माणूस तेंव्हा चुकतो, जेंव्हा त्याचा विचार, त्याची विचारप्रक्रिया, त्याची विचारधारा कुणीतरी बदलायचा किंवा प्रभावित करायचा प्रयत्न करतं."
- अ. ज. ओक.