Saturday, February 11, 2012

उद्रेक

वर्तमानपत्रात एखादी खुनाची, किंवा तत्सम बातमी वाचली की बरेचवेळा मला त्यामागे सूड, विकृती, वैमनस्य अशी कुठलीही भावना न दिसता केवळ एकच गोष्ट दिसायची; उद्रेक. मग वाटायचं की मला जे वाटतय ते तितकं खरं नसेलही, आणि त्याबद्दल लिहायचं मी टाळायचो. पण नाही; या अशा बातम्या येत गेल्या, आणि माझं म्हणणं मला आणखी जास्त पटत गेलं.

उद्रेक हा काहीसा ज्वालामुखी सारखा असतो. अनेक काळ तापत धुमसत राहून मग एक दिवस ज्वालामुखी ज्याप्रमाणे उसळतो, त्याप्रमाणेच चीड, नाखुशी, साचत जाऊन तिचं रुपांतर उद्रेकात होतं. भारतातच नव्हे, तर सगळ्याच देशात तुम्हाला हे कमीअधिक प्रमाणात आढळेल. मग एसटी ड्रायव्हर ने रस्त्यावर घातलेला हैदोस म्हणा, कुठल्याशा परदेशात तत् स्थित परप्रांतियांवरचे हल्ले म्हणा, आपल्या राज्यात रुजणारी परप्रांतियांविरुद्धची भावना म्हणा, शिक्षकाच्या अत्याचाराला उत्तर म्हणून विद्यार्थ्याने त्याला केलेली मारहाण म्हणा, अशी अनेक उदहरणं आहेत. यात कुठली बाजू योग्य किंवा कुठली अयोग्य या विषयाबद्दल मी कोणताही विचार मांडत नाही. परंतु या सगळ्या घटनांमध्ये मला, एक साचत गेलेली, आणि पुढे स्फोटक झालेली, अशी भावना दिसते.

अशा प्रकारांचं वाढतं प्रमाण बघता; भीती वाटते. आणि त्यात हे प्रकार वाढत जाण्याचीच लक्षणं दिसतात. उद्रेक; तो कधी सज्जनांचा दुर्जनांप्रत झालेला उद्रेक असेल, किंवा कधी उपेक्षितांचा, शोषितांचा, शोषण करणा-यांप्रत.

पुढे काही वर्षांनी भारतात अफ्रिकन देशांसारखी परिस्थिती उद्भवली, लोकं दिवसाढवळ्या शस्त्रांच्या धाकाने एकमेकांना लुटायला लागली, तर नवल वाटायला नको. उद्या सगळी जनता रस्त्यावर उतरून भ्रष्ट नेत्यांना चक्क धरून मारायला लागली तर ती आश्चर्याची गोष्ट नसेल. मुलांना गुरासारखं मारणा-या शिक्षकांना पालकांनी मिळून बुकललं, काळं फासलं, तर ते अपेक्षितच असेल. चोरगिरी करणा-या दुकानदारांची शहरवासियांनी धिंड काढली तर ते दृश्य चक्रावून टाकणार नाही...

हे अनेकांना फार Negative किंवा Pessimistic स्टेटमेंट वगैरे वाटेल, पण हेच माझं मत आहे, की, भारताबद्दल बोलायचं झालं, तर,


‘उद्रेक हेच भविष्य आहे’
- अ. ज. ओक.

No comments:

Post a Comment