Wednesday, February 22, 2012

People

We see millions of people; we talk with thousands of people; we meet hundreds; and know a few. Interactions with them always give you different insights. Every discussion with someone is a learning; about that person and about yourself, provided you look at it that way. 
Today, when I think about the people I have seen, I have talked with, I have met and I have known; I can identify two distinct, prominent, and highly effective types of people, without whom I could not have understood life as much as I have so far.
'There are some people who have PROBLEMS you cannot imagine, and QUESTIONS you cannot answer. And there are some, who have SOLUTIONS you cannot imagine, and ANSWERS you cannot question.' 
 - A J Oka.

Wednesday, February 15, 2012

डे चे ’फन’डे

पाश्चात्य संस्कृतीतल्या चुकीच्या गोष्टीच नेमक्या भारताने उचलल्यात, अशी एक नेहमी ऐकू येणारी ओरड आहे. ती खरीही आहे काही अंशी. आपल्याकडे खरंच तिथल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी सोयीस्करपणे उचलून त्यांचं स्वरूप खूप वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे आणि एकंदरीतच त्या ’संस्कृती’ कडे बघण्याचा भारतातल्या बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हा काहीसा वक्रच असतो.

कालच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला. या ’डे’ विषयी बोलताना अनेक जण “या’डे’पणा’ आहे’ असं म्हणतात, अनेक जण तो हॉटेलात जाऊन, भेटकार्ड देऊन, सिनेमा बघून साजराही करतात. आणि एक पंथ असं म्हणणा-यांचा असतो की प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कशाला हवा?... ते रोज आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त झालं पाहिजे वगैरे वगैरे. आणि हाच नियम मग मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे सगळ्यांना लागतो.. ते सगळे ’डे’ सुद्धा चुकीचे किंवा अनावश्यक ठरतात.

काल माझ्या एका सहकर्मचा-यांशी सहज याविषयी बोलत होतो, तर त्यांचाही विचार वर मांडल्याप्रमाणेच दिसला; की हा दिवसच कशाला... इत्यादी. मला याबद्दल असं वाटतं की,

’... जसं गणपती समोर आपण रोजच हात जोडतो, तरीही संकष्टी चं महत्व वेगळं असतं, विठठलाचं नाव नेहमी मुखात असलं तरीही आषाढी - कार्तिकी ची ओढ आगळी असते, तसंच काहीसं या ’डे’ज बद्दल आहे...’


मी म्हटलंही त्यांना तसं. अर्थात, व्हॅलेंटाईन किंवा इतर कुठल्याही डे च्या नावाखाली जे गैरप्रकार आणि जी फालतूगिरी चालते, त्याचं मी मुळीच समर्थन करत नाही, किंबहुना त्याला माझा तीव्र विरोध आहे. एवढंच म्हणणं आहे, की या संस्कृतीतला जो चुकीचा भाग घेतलाय त्याला विरोध करणं ही एक गोष्ट झाली; पण त्या संस्कृतीला आपल्या परंपरेनुसार वळण देऊन जर त्यातील पटतील ते सण, दिवस, रुचतील तसे साजरे केले, तर हरकत का असावी!

- अ. ज. ओक

Saturday, February 11, 2012

उद्रेक

वर्तमानपत्रात एखादी खुनाची, किंवा तत्सम बातमी वाचली की बरेचवेळा मला त्यामागे सूड, विकृती, वैमनस्य अशी कुठलीही भावना न दिसता केवळ एकच गोष्ट दिसायची; उद्रेक. मग वाटायचं की मला जे वाटतय ते तितकं खरं नसेलही, आणि त्याबद्दल लिहायचं मी टाळायचो. पण नाही; या अशा बातम्या येत गेल्या, आणि माझं म्हणणं मला आणखी जास्त पटत गेलं.

उद्रेक हा काहीसा ज्वालामुखी सारखा असतो. अनेक काळ तापत धुमसत राहून मग एक दिवस ज्वालामुखी ज्याप्रमाणे उसळतो, त्याप्रमाणेच चीड, नाखुशी, साचत जाऊन तिचं रुपांतर उद्रेकात होतं. भारतातच नव्हे, तर सगळ्याच देशात तुम्हाला हे कमीअधिक प्रमाणात आढळेल. मग एसटी ड्रायव्हर ने रस्त्यावर घातलेला हैदोस म्हणा, कुठल्याशा परदेशात तत् स्थित परप्रांतियांवरचे हल्ले म्हणा, आपल्या राज्यात रुजणारी परप्रांतियांविरुद्धची भावना म्हणा, शिक्षकाच्या अत्याचाराला उत्तर म्हणून विद्यार्थ्याने त्याला केलेली मारहाण म्हणा, अशी अनेक उदहरणं आहेत. यात कुठली बाजू योग्य किंवा कुठली अयोग्य या विषयाबद्दल मी कोणताही विचार मांडत नाही. परंतु या सगळ्या घटनांमध्ये मला, एक साचत गेलेली, आणि पुढे स्फोटक झालेली, अशी भावना दिसते.

अशा प्रकारांचं वाढतं प्रमाण बघता; भीती वाटते. आणि त्यात हे प्रकार वाढत जाण्याचीच लक्षणं दिसतात. उद्रेक; तो कधी सज्जनांचा दुर्जनांप्रत झालेला उद्रेक असेल, किंवा कधी उपेक्षितांचा, शोषितांचा, शोषण करणा-यांप्रत.

पुढे काही वर्षांनी भारतात अफ्रिकन देशांसारखी परिस्थिती उद्भवली, लोकं दिवसाढवळ्या शस्त्रांच्या धाकाने एकमेकांना लुटायला लागली, तर नवल वाटायला नको. उद्या सगळी जनता रस्त्यावर उतरून भ्रष्ट नेत्यांना चक्क धरून मारायला लागली तर ती आश्चर्याची गोष्ट नसेल. मुलांना गुरासारखं मारणा-या शिक्षकांना पालकांनी मिळून बुकललं, काळं फासलं, तर ते अपेक्षितच असेल. चोरगिरी करणा-या दुकानदारांची शहरवासियांनी धिंड काढली तर ते दृश्य चक्रावून टाकणार नाही...

हे अनेकांना फार Negative किंवा Pessimistic स्टेटमेंट वगैरे वाटेल, पण हेच माझं मत आहे, की, भारताबद्दल बोलायचं झालं, तर,


‘उद्रेक हेच भविष्य आहे’
- अ. ज. ओक.

Sunday, February 5, 2012

आग्रह

जेवण आणि त्यात होणारा ’आग्रह’ हा भारतीय सण-समारंभातला फार महत्वाचा भाग आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा ’सोसलेला’ असेल. ’सोसणं’ हा शब्द मुद्दाम वापरला कारण बहुतेकदा आग्रह खेळीमेळीने घेण्याजोगता होत नाही. 
माझ्या मते आग्रह करताना खाणा-याला पदार्थाची निवड करण्याची मुभा हवी. एखाद्याला गोड आवडत नसेल तर त्याला गुलाबजाम, जिलबी, अशा व्यंजनांचा आग्रह करणं म्हणजे त्या आग्रहाची गोडी घालवणं आहे. त्याच व्यक्तीला रस्सा भाजी किंवा मसालेभाताचा आग्रह करा, तो कदाचित वाढपीला चांगला व्यायाम देईल. बरं, आग्रह एका व्यक्तीने केला की त्या कुटुंबातली आणखी २-३ मंडळी तिथे येतात. "मी कुठे केलाय अजून आग्रह.." असं म्हणून एकीकडे आग्रहाचं व्यंजन पानात वाढून मोकळी होतात. 
आणि आग्रह ज्याला करताय त्याचं वय, त्याची आवड, त्याची त्या वेळची प्राकृतिक स्थिती, हे सगळं बघायलाच हवं. माणसाचा स्वभाव आहे, की राजीखुशीने केलेली गोष्ट आनंददायी होते पण तीच गोष्ट लादली की त्याची मजा जाते. म्हणून वाटतं,

"आग्रह ठीक आहे, पण आग्रहाचा आग्रह म्हणजे दुराग्रहच; नाही का!"
- अ. ज. ओक