एखादी व्यक्ती नुसतीच यशस्वी होउन भागत नाही. ते यश असं प्रदीप्त व्हायला त्या व्यक्तीला एखादी उपाधी, एखादी पदवी किंवा आदरयुक्त प्रेमाने ठेवलेलं नाव असणं हे आजकाल गरजेचं आहे. तरच मग मजा आहे. आता भारताचे एक आघाडीचे संगीत दिग्दर्शक घ्या ना. इतका फॅन आहे मी त्यांचा म्हणून सांगू; मीच काय देशभरात, अवघ्या विश्वात त्याचे कोट्यावधी फॅन्स आहेत. हमराज़, तेरे नाम, आशिक बनाया आपने, रेडियो, कर्झ्झ्झ्झ, बॉडिगार्ड, नुकतेच आलेले सन ऑफ सरदार आणि खिलाडी ७८६, असे अनेक सिनेमे त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाने खुलवलेले, नव्हे, एकहाती गाजवलेले आहेत. आणि हे केवळ गाण्याबद्दल झालं; त्यांचा अभिनय, लेखन, दिग्दर्शन हे स्वतंत्र विषय आहेत बरं का.
गाणं हे गळ्यातूनच नव्हे तर नाकातूनही गाता येतं हे खरं तर त्यांनी पटवून दिलं जगाला. काय सूर लागतो त्यांच्या नाकाचा. आहाहाहा! व्वेड लागतं. ही कला भारतात दुस-या कुणालाही अवगत नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यांच्यासारखे तेच. एकमेव.
प्रतिभावंत माणूस.... पण एखादीही उपाधी, पदवी अशी अजून त्याच्या नावासमोर नाही. असायला पाहिजे बुवा. सारेगमप मधे रॉकस्टार वगैरे म्हणून संबोधतात त्याला, पण त्यात दम नाही. पदवी कशी जबरदस्त पाहिजे.
हाच विचार करताना मी एक लहान नाकी, आय मीन, लहान तोंडी मोठा घास घेतोय, आणि त्यांना एक उपाधी देतोय. ‘नाकगंधर्व’ ! त्यांचा सन्मान करायला हे कमीच आहे म्हणा, पण तरीही.