Friday, July 12, 2013

भारताचं खरं दुर्दैव

नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं. तसं ते वाण्याकडून चार साबण आणायला गेलो तरीही बघायला मिळतं; पण अशा विशेष ठिकाणी, किंवा काही विशेष सण-समारंभात ते जरा ‘विशेष’ असतं. रस्त्यावर गाडी चालवताना तर आपण जगाचे राजे हा भाव तनामनात घेऊन लोकं वावरतात. म्हणजे सांगायचंच झालं, तर त्यांच्या वाटेमधे साधं पाखरू जरी आलं तरी त्याची आई-बहीण काढतात. 

आता रांग आहे, म्हणजे आपल्या पुढे लोकं असू शकतात. पण आपण जगाचे राजे म्हटल्यावर आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो? मग अरेरावी करणे; चार शिव्या देणे किंवा ज्याचं आपल्याला बाळकडू मिळालंय तो भ्रष्टाचार करणे (संबंधित व्यक्तीस चार पैसे टेकवावेत, की... हं !) हे बघायला मिळतं. पैसे ही कमवण्याची, साठवण्याची, (देण्याची वगैरे सोडाच) गोष्ट नसून ती दाखवण्याची गोष्ट आहे; हे इथलं तत्वज्ञान आहे.

हा विषय मोठा आहे; पण थोडक्यात कसं आहे, की वर नमूद केल्याप्रमाणे जे वागतात, त्यांना ते चूक आहे हे कळण्याची बुद्धी नसते, आणि ज्यांना ते चूक आहे के कळण्याची बुद्धी असते, त्यांना तसं वागवणा-यांना थांबवणं शक्य नसतं.भारत म्हणूनच मागे आहे आणि सदैव राहील.
‘लायकी नसलेल्यांकडे पैसा आहे; आणि हिंमत नसलेल्यांकडे अक्कल आहे; हेच भारताचं खरं दुर्दैव आहे.’
- अ. ज. ओक